Ad will apear here
Next
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस
लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात; पण गुंतवणूक आणि बचत यात फरक आहे. याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे पुस्तक लिहिले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून आर्थिक उद्दिष्ट कसे साध्य करावे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
.......
श्रेयस म्हणजे चांगले आणि प्रेयस म्हणजे आवडीचे. श्रेयस हे चांगले असले, तरी आवडीचे असेलच असे नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा श्रेयस आणि प्रेयस यातील एकाची निवड करणे आवश्यक असते. अशा वेळेस यातील उपयुक्त पर्याय निवडण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला याबाबत माहिती असणे आवश्यक असते. योग्य माहितीमुळे आपण योग्य पर्यायाची निवड करू शकतो. या प्रकरणामध्ये म्युच्युअल फंडाची निवड करताना याचा उपयोग कशा प्रकारे करता येईल, याची माहिती आपण करून घेऊ या.

बँक मुदत ठेव, पोस्ट योजना व म्युच्युअल फंड योजना
बँक मुदत ठेव, पोस्टाच्या योजना आणि म्युच्युअल फंड योजना या प्रत्येक पर्यायाची निवड गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्ट्यांनुसार करणे आवश्यकअसते; मात्र अनेकदा निवड करताना ‘श्रेयस’ऐवजी प्रेयसची (चांगल्याऐवजी आवडीच्या पर्यायाची) निवड गुंतवणूकदार करतात. साहजिकच गुंतवणुकीतील जोखमीचे प्रमाण वाढते आणि अनेकदा आर्थिक उद्दिष्टदेखील योग्य प्रकारे साध्य करणे शक्य होत नाही. काही उदाहरणांच्या मदतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

उदाहरण पहिले : माधवराव सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना १८ लाख रुपये कंपनीकडून मिळाले. गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे त्यांनी बँकेत मुदत ठेव करून त्यातील व्याजावर गृहखर्च चालवण्याचे नियोजन केले. दरम्यान, बँकेतील मुदत ठेवीवरील व्याजदरात मोठ्या प्रमाणावर कपात झाल्यामुळे गृहखर्च कसा चालवायचा असा प्रश्न त्यांनी आपल्या सेवानिवृत्तांच्या ग्रुपमध्ये उपस्थित केला. ‘माझ्याप्रमाणे तुम्हीदेखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा,’ असा सल्ला त्यांच्या मित्राने त्यांना दिला. त्याचप्रमाणे जास्त व्याज मिळवण्यासाठी सहकारी बँक आणि कंपनी डिपॉझिट यांमध्येदेखील गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांना मित्राने दिला.

माधवरावांनी याबाबत एका आर्थिक नियोजनकाराशी संपर्क साधला. राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा सहकारी बँकेत मुदत ठेव करण्यात असणारी जोखीम, कंपनी डिपॉझिट गुंतवणुकीत असलेली जोखीम, तसेच वयाच्या ६५व्या वर्षी शेअर्स आधारित म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणुकीत असलेली जोखीम, याबाबत सविस्तर माहिती देऊन काही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत आणि काही रक्कम कमी जोखीम असणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणण्याचा सल्ला आर्थिक नियोजनकाराने माधवरावांना दिला.

माधवरावांप्रमाणे अनेक सेवानिवृत्त व्यक्तींना एक ते दोन टक्के अधिक व्याज मिळवण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा सहकारी बँक आणि कंपनी डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा होते. या पर्यायांमध्ये थोडे जास्त रिटर्न्स मिळत असले, तरीही त्यात असणारी जोखीम जाणून घेऊनच (ती जोखीम घ्यायची तयारी असली तरच) अशा पर्यायांमध्ये गुंतवणुकीबाबत अंतिम निर्णय घ्यावा.

सेवानिवृत्तीपूर्वी एक रुपयादेखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक न केलेल्या व्यक्तीदेखील म्युच्युअल फंडातून खूप जास्त रिटर्न्स मिळवण्यासाठी १०० टक्के शेअर्सशी निगडित म्युच्युअल फंडातदेखील गुंतवणुकीस तयार होतात. १०० टक्के शेअर्स आधारित गुंतवणुकीतून खूप चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता असली, तरीही या गुंतवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम असते. त्यामुळे माधवरावांप्रमाणे आर्थिक सल्लागार किंवा नियोजनकाराशी संपर्क साधून आपल्या जोखीम घ्यायच्या क्षमतेशी सुसंगत अशा पर्यायातच गुंतवणूक करावी.

उदाहरण दुसरे : ३४ वर्षीय राकेश मागील दोन-तीन वर्षांपासून शेअर्समध्ये ट्रेडिंग करत आहे. शेअर्स ट्रेडिंगप्रमाणेच काही प्रमाणात डेरिव्हेटिव्ह, कॉल या प्रकरणी जोखीम घेऊन गुंतवणूक केल्यामुळे राकेशचे मागील आर्थिक वर्षात किमान तीन लाखांचे नुकसान झाले आहे. शेअर्सवर आधारित गुंतवणूक करून फायदा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला राकेशला आर्थिक सल्लागाराने दिला. राकेशलाही आता अनुभवातून ट्रेडिंगपेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर असल्याची खात्री पटली आहे. राकेशप्रमाणे अनेक गुंतवणुकदारांना काही वर्षे ट्रेडिंग, कॉल यांच्यात व्यवहार केल्यावर ट्रेडिंगपेक्षा दीर्घ कालावधीसाठी शेअर्समधील गुंतवणूक अथवा शेअर्स आधारित म्युच्युअल फंडातील गुंतवणूकच फायदेशीर आहे याचा अनुभव येतो. परंतु शेअर ट्रेडिंगमध्ये दररोज काही प्रमाणात नफा होण्याची शक्यता असल्यामुळे काही प्रमाणात कंटाळवाणा वाटणारा दीर्घकालीन गुंतवणुकीचा मार्ग तेवढा आकर्षक वाटत नाही. म्हणूनच अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाची निवड करत नाहीत.

उदाहरण तिसरे : सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी केवळ खात्रीशीर परतावा मिळणाऱ्या पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करणे.
सेवानिवृत्तीचे नियोजन करताना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असते. साहजिकच शेअर्स आधारित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते. शेअर्स आधारित गुंतवणुकीमध्ये परतावा (रिटर्न्सचे प्रमाण) खात्रीशीर नसतो. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार शेअर्स आधारित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक श्रेयस (चांगली) आहे, याची माहिती असूनही पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करतात. 

मागील काही वर्षांपासून आर्थिक साक्षरता वाढल्यामुळे अनेक तरुण व्यक्ती (अगदी २४-२५ वर्षांच्यादेखील) सेवानिवृत्तीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात, असे आशादायक चित्रदेखील दिसून येते.

उदाहरण चौथे : अल्प कालावधीसाठी किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करायची झाल्यास शेअर्स आधारित म्युच्युअल फंडात करणे.
मागील वर्षातील रिटर्न्स बघितल्यास अर्थातच मिड कॅप फंड किंवा शेअर्स आधारित म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स खूप जास्त असू शकतात. गुंतवणूक केवळ पाच-सहा महिन्यांसाठी किंवा अगदी एक-दोन वर्षांसाठी (मध्यम कालावधीसाठी) करायची असेल, तर नवीन गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता असणाऱ्या फंडात गुंतवणूक करण्याचा मोह होतो. प्रत्यक्षात मात्र अल्प कालावधीसाठी मिडकॅप अथवा १०० टक्के शेअर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे जोखमीचे असते. याकरिता शेअर्समध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य ठरते. 

उदाहरण पाचवे : म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरशी एखादी व्यक्ती संपर्क साधते आणि एखाद्या नवीन योजनेत गुंतवणूक करायची इच्छा व्यक्त करते. नवीन योजना बाजारात येते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. साहजिकच अनेक जण स्वत:हून म्युच्युअल फंड विक्रेत्याकडे नवीन योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त करतात. अशा वेळेस म्युच्युअल फंड विक्रेत्याची कसोटी असते. नवीन योजना त्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त असेल तर विक्री त्वरित करणे शक्य होते; मात्र नवीन योजना त्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त नसेल तर नवीन योजनेऐवजी बाजारात उपलब्ध असणारी आणि त्या ग्राहकांसाठी उपयुक्त असणारी योजना (संभाव्य ग्राहकाच्या जोखीम घ्यायच्या क्षमतेशी सुसंगत योजना) अशा दोन्ही योजनांविषयी ग्राहकास योग्य माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी म्युच्युअल फंड विक्रेत्यास पार पाडावी लागते.

श्रेयस आणि प्रेयस या प्रकरणात काही प्रातिनिधिक उदाहरणांच्या मदतीने म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी, आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत योजना निवडणे का आवश्यक आहे, याबाबत माहिती दिली आहे. केवळ गुंतवणूकदारांनाच नाही, तर म्युच्युअल फंड विक्रेत्यालासुद्धा संभाव्य ग्राहकासाठी श्रेयस काय आहे हे जाणून घेऊन गुंतवणुकीचा सल्ला द्यावा लागतो. याकरिता त्या संबंधीचेही एक उदाहरण दिले आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन आपल्यासाठी श्रेयस योजना निवडा आणि आपली आर्थिक उद्दिष्टे योग्य प्रकारे साध्य करा.

(‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे देवदत्त धनोकर यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZBSCH
Similar Posts
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
‘दीर्घ काळातील मोठ्या लाभासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर’ पुणे : ‘भविष्यात सोन्यातील गुंतवणुकीवर आजच्याइतके फायदे मिळणे शक्य नाही; मात्र शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील फायदा वाढवणे शक्य आहे. जोखीम घेऊनदेखील फायदेशीर गुंतवणूक करणे म्युच्युअल फंडाद्वारे शक्य आहे. ३० वर्षांत आपण केलेल्या गुंतवणुकीच्या चार ते ४० पट वाढ होण्याची क्षमता म्युच्युअल फंडातील
‘स्मार्ट’ गुंतवणूक... संपत्तीच्या दीर्घकालीन वृद्धीसाठी : मंदार म्हात्रे (व्हिडिओ) पैशांची बचत, गुंतवणूक याबाबत आपल्याला सल्ले देणारे बरेच जण असतात; पण त्यातून बऱ्याचदा ही गुंतवणूक म्हणजे एक ओझं होऊन बसते. ही गोष्ट लक्षात घेऊन, गुंतवणूक या विषयातील तज्ज्ञ मंदार म्हात्रे यांनी ‘पापा डोन्ट प्रीच’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात
निवृत्तीनंतरचा आधार - एनपीएस वाढते आयुर्मान, विभक्त कुटुंब पद्धती व झपाट्याने बदलत जाणारे राहणीमान यामुळे निवृत्तीनंतरचे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान हा एक चिंतेचा विषय होऊन गेला आहे. या दृष्टिकोनातून आजच्या तरुण पिढीला आपल्या निवृत्तीनंतरची काळजी वेळीच घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच यासाठीच्या ‘एनपीएस’ या अगदी योग्य अशा पर्यायाची माहिती घेऊ या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language